गर्दीतील शांतता
13 एप्रिल, सोलापूर जिल्ह्यामधे असणाऱ्या एका छोट्याशा गावाचा उरूस.
डोंगर फोडून वसलेल्या एका गावात हळू हळू लोकसंख्या वाढत होती. लोकांचा
सुसंवाद वाढत होता, नवनव्या संकल्पना गावात रुजू होत होत्या. गावचा उरूस ही
संकल्पना म्हणजे ग्रामदैवतेच्या पूजेचा दिवस, संपूर्ण वसलेल गाव उत्साहाने एकत्र येणे.
आज कोंबडीच्या बांगाने उठलेल्या गावातील रहिवास्यांच्या घरी पाहुण्यांची वर्दळ चालू आहे.
पहाटेलाच उठून ग्रामदैवतेच्या नैवेद्याची तयारी प्रत्येक घरा घरात चालू झाली.
प्रत्येक घरात गोड पदार्थांचा वास दरवळत होता. शेजारच्या गावातून येणाऱ्या पाहुण्यांचा
पाहुणचार आणि आवर्जून होणारी एकमेकांविषयीची विचारपूस प्रत्येक घरात चालू होती.
लहान लहान मुले नवे कपडे घालून तयार झालेली होती. वातावरण अगदी आनंदी होऊन गेल
होतं. डोक्यावरील सुर्य थोडा मावळतीच्या मार्गावर ढळण्याची चाहूल लागताच हळू हळू लोकांची
वर्दळ गावामध्ये वाहू लागली. गावच्या चौरह्यावर वसलेलं रामाचं मंदिर गावकर्यांनी
छान रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं, मंदिराबाहेर नक्षीकांत रांगोळी काढली होती,
लहान लहान मुलांना आकर्षित करणार्या बर्याच प्लास्टिकच्या खेळण्यांच्या टोपल्या
उरूसामध्ये दिसत होत्या, पिपाणीचा आवाज, गडबड गोंधळ, हसण्या खिदळण्याचा आवाज,
उंच पाळण्यामध्ये बसून आपला आनंद व्यक्त करणार्या लोकांचा आवाज....
शेव रेवडीचा आणि पेठाचा वास देखील दरवळत होता, कपडे विक्रेते, मंदिराबाहेर हार फुलं, गजरे विक्रेत्यांचे
गाळे, या सर्व गोष्टींनी वातावरण उत्साही बनून गेले होते. वर्षातला एक दिवस जिथे गाव
आवर्जून एकत्र जमतं, "आमच्या गावचा उरूस" अभिमानाने वाखाणणे ही प्रत्येकाची ठळक
रितीने सांगण्याचा एक वेगळाच अभिमान असतो.
गावातील सरजामे कुटुंबातील पंधरा वर्षांची आपल्या आईचा हाथ धरून गावच्या उरूसातील गर्दी
मधून नीटसा श्वास पण न घेता येणारी शुभांगी खेळण्याचे आवाज, लोकांची आवड, गर्दीतला धुमाकूळ बऱ्याचशा गोष्टी कुतूहलाने पाहत होती. काही अंतरा वर शुभांगी ची आई उरूसातील बांगड्या
घेण्यासाठी सभोवताली असणाऱ्या गर्दी तुन स्वतःची वाट करत थांबली.शेव रेवडी च्या गाड्या जवळ असणाऱ्या, एक फाटक गोण अंथरून बसणाऱ्या मुलाकडे शुभांगी ची नजर आपोआप खेचली जाते.
काळवंडलेल शरीर, अंगावर फाटका शर्ट, भुकेपोटी आसूसलेल मन ,अणवाणी आणि हिरमुसलेला चेहरा असा हा लगबग 21/22 वर्षाचा व्यंकट.
व्यंकट कोण्या गावावरून चार पैश्याच्या आशेसाठी उरूसात हार- फुल विकत होता.
हलकासा पाऊस पडण्यास सुरुवात होते. पावसाचा टपोरा थेंब त्याने माळलेल्या हार- फुला वर पडताच चार पैश्यासाठीची आशा धाडकन कोसळन्याची जाणीव त्याच्या डोळ्यात दिसू लागते.
माळलेल्या हार-फुला वर पडलेला टपोरा पावसाचा थेंब टचकन डोळ्यात पाणी आणतो.
खातरी करण्यासाठी पुनः एकदा आकाशाकडे बघतो आणि हातात नसणाऱ्या गोष्टी सोडून देऊन आपलं चार पैसे कमावन्याच साधन आवरायला घेतो.
शुभांगी आपल्या अवती भवती घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी पैकी ही गोष्ट डोळ्याने पाहत होती.
हा प्रकार अवघ्या दोन मिनिटांचा असावा जो तिच्या डोक्यात असंख्य प्रश्नांचा साचा करून गेला.तिच्या डोक्यात, गर्दीत असणारी पण मनाला भीडनारी गोष्टी ने मात्र हृदयात घर केल, जशी गर्दीतील शांतता....
गर्दीतील या शांततेने ती अबोल झाली.
स्तब्ध झालेल्या मुलीला कधी तिच्या आई ने घट्ट पकडलेला हाथ खेचला ते कळालच नाही.